पनामा, व सुवेझ कालवे आणि गंगावतरण
वसंत गणेश काणे
एल बी ७, लक्ष्मीनगर,पाण्याच्या टाकीजवळ ,नागपूर ४४० ०२२
बी एस्सी ;एम ए(मानसशास्त्र); एम.एड.
Email – kanewasant@gmail.com ; Blg – kasa mee?
0712)2221689, 9422804430
हल्ली वास्तव्य – 2215; Live Oak Lane,
York, PA. USA
यॉर्क ,पेनसिल्व्हॅनिया
पनामा कालवा १५ ऑगस्ट २०१४ ला शंभर वर्षांचा झाला. पण जगातला दोन समुद्रांना- भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र (रेड सी)- जोडणारा पहिला मानवनिर्मित सुवेज कालवा त्याच्यापेक्षा कितीतरी जुना आहे. इसवी सनापूर्वी १८७४ साली (नक्की सांगायचे तर ३८८८ वर्षांपूर्वी) इजिप्तचा राजा सेनौसार्त (तिसरा) याने हा कालवा खणण्याचा प्रयत्न केल्याचे इतिहास सांगतो. पण गाळ साचत गेल्यामुळे हा प्रयत्न सोडून द्यावा लागला. नंतर अनेक प्रयत्न झाले. नेपोलियनने सुद्धा हा कालवा खणण्याचा प्रयत्न केला होता. पण भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र (रेड सी) यांच्या पातळीची उंची मोजण्यातचूक झाली म्हणून म्हणा किंवा अशीच काहीतरी चूक होऊन त्याने हा विचार सोडून दिला. नौकानयनासाठी या कालव्याचा उपयोग व्हायला १८६९ हे साल उजाडावे लागले. या सालच्या १७ नोव्हेंबरला पहिली नौका या कालव्यातून पार करून एका समुद्रातून दुसऱ्या समुद्रात-भूमध्य समुद्रातून लाल समुद्रात-गेली. या कालव्याचा फायदा असा झाला की, आफ्रिकेला वळसा घालणे वाचले. यामुळे पैसा आणि वेळ वाचला आणि व्यापाराला आणि प्रवासाला चालना मिळाली. ब्रिटन व फ्रान्स या देशातील कंपनीचे या कालव्यावर नियंत्रण होते. इजिप्तमध्ये क्रांती होऊन नासर सत्ताधीश झाला. त्याला सहाजिकच कालव्यावर आपले स्वामित्व असावे, असे वाटत होते.
सुवेझवर स्वामित्व मिळावे म्हणून संघर्ष
ब्रिटन, फ्रान्स आणि इस्राईल विरुद्ध इजिप्तचा अध्यक्ष नासर यांच्यात १९५६ मध्ये या कालव्याच्या प्रश्नावरून निर्माण झालेले वितुष्ट विकोपाला गेले. आपला सुवेझ कालव्यावर ताबा कायम रहावा असा ब्रिटन आणि फ्रान्सचा मनोदय होता. पण नासरने कालव्याचे राष्ट्रीयीकरण करून कालवा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. वादाच्या ठिणगीचे रुपांतर युद्धात झाले. नासरने कालव्यात बोटी बुडवून तो निरुपयोगी करण्याचा प्रयत्न केला. अमेरिका, रशिया आणि युनो यांनी आपले सगळे कौशल्य पणाला लावून युद्धविराम घडवून आणला. पण नासारला पदच्युत करून कालवा आपल्या ताब्यात ठेवणे ब्रिटन, फ्रान्सला शक्य झाले नाही. दुसऱ्या महायुद्धानंतरच ब्रिटनच्या प्रतिष्ठेला ओहटी लागली होती. या युद्धानंतर ब्रिटनची गणना महाशक्तींमध्ये होईनाशी झाली. पुढे निरनिराळ्या निमित्ताने हा कालवा तब्बल पाच वेळा बंद झाला. शेवटी १९७५ सालच्या नोव्हेंबरमध्ये तो वाहतुकीसाठी खुला झाला तो निदान आजपर्यंत तरी सुरु आहे.
उत्तर आणि दक्षिण अमेरिका वेगळे करणारा पनामा
पनामा कालवा आता चांगलाच रुंद होत असून हा रुंद कालवा १५ ऑगस्टला शंभर वर्षांचा होऊन वाहतुकीसाठी खुला होतो आहे. कालवा रुंद करण्याचा हा प्रयत्न जगातील सर्वात मोठा आणि खर्चिक स्वरूपाचा पायाभूत सोयी सवलतीचा विकास करण्याचा प्रयत्न मानला जातो आहे. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारी अरुंद पट्टी खोदून हा कालवा तयार केला आहे. वाळूच्या घड्याळातील काचेच्या दोन अर्धगोलाकार पात्रांना जोडणारी जशी एक अरुंद नलिका असते, तसा भूभाग पनामा देशात कालवा तयार होण्यापूर्वी होता. पहिला अर्धगोल म्हणजे उत्तर अमेरिका आणि दुसरा अर्धगोल म्हणजे दक्षिण अमेरिका आणि यांना जोडणारी चिंचोळी पट्टी म्हणजे पनामा देश. असाच निमुळतेपणा ग्वाटेमाला, निकाराग्वा, होन्डुरास या सारख्या अशाच चिंचोळ्या भूभागातही आहे. पण सर्वात निमुळती ८० किलोमीटरची पट्टी पनामा देशात आहे. एका बाजूला आहे अटलांटिक महासागर (या भागात त्याला ‘कॅरेबियन सी’ असे म्हणतात) तर दुसऱ्या बाजूला आहे पासिफिक महासागर. या कालव्यामुळे दक्षिण अमेरिकेला वळसा घालण्याचा हजारो किलोमीटरचा जलप्रवास वाचला आणि पैसा आणि वेळेचीही बचत झाली.
कौशल्य, प्रयत्न आणि जिद्द यांची दोन मूर्तीमंत उदाहरणे
पनामा आणि सुवेझ हे दोन्ही कालवे मानवाच्या तंत्रज्ञानविषयक कौशल्याची, भगीरथ प्रयत्नांची, जिद्दीची साक्ष देणारे आहेत. पनामा १९१४ साली वाहतुकीला खुला झाला असला तरी ही कल्पना १५२९ सालापासून लोकांच्या मनात होती. या दृष्टीने विविध सूचना समोर येऊ लागल्या होत्या. शेवटी पनामा राज्यातून हा कालवा काढणे सोयीचे ठरेल, असे नक्की झाले. कालवा खणण्याचे काम करणाऱ्या कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कालवा खणात असतांना एकूण वीस हजार कामगारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा कालवा खणण्यासाठी ८ वर्षे लागतील, असा प्राथमिक अंदाज होता, पण तो चुकला. काठाचे खडक खचणार नाहीत, अशी समजूत होती. पण प्रत्यक्षात नेमका उलट अनुभव आला. इतरही अनेक समस्या उद्भभवल्या या समस्यांचे स्वरूप राजकीय, आर्थिक, आणि तांत्रिक असे त्रिविध होते. शेवटी सर्व अडचणींवर मात करून हा कळवा एकदाचा तयार झाला. हे दोन्ही कालवे जगाच्या अर्थकारणावर तसेच आधुनिक जगाच्या इतिहासावर फार मोठा परिणाम करणारे ठरले. पैसा आणि जलप्रवासासाठी लागणारा वेळ वाचवण्याचे फार मोठे काम या दोन्ही कालव्यांनी साध्य केले आहे.
पनामाचे वेगळे स्वरूप
पनामा कालवा पार करायला आठ ते दहा तास लागतात. याच्या शेजारूनच चाग्रेस नावाची महाकाय नदी वाहते. या नदीवर धरण बांधून एक भले मोठे सरोवर बांधले आहे. याची सरोवराची उंची अटलांटिक महासागरपेक्षा (कॅरेबिअन सी) २६ मीटर जास्त आहे. या सरोवरातील पाणी कालव्यात सोडून किंवा त्यातून पाणी काढून कालव्याची पातळी कमी अधिक उंच करता येते. ही एक क्लिष्ट क्रिया असून तिला ‘लॉक तयार करणे’असे म्हणतात. अशाप्रकारे पाणी सोडून कालव्याची उंची वाढवतात किंवा कमी करून तो सखल करतात. हा सगळा खटाटोप करावा लागतो याचे कारण असे आहे की, पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागरापेक्षा खालच्या पातळीवर आहे. त्यामुळे अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जाणाऱ्या जहाजाला क्रमाक्रमाने उतरवत उतरवत हलकेच पॅसिफिक महासागरात त्याच्या उंचीवर आणून सोडावे लागते तर उलट पॅसिफिक महासागरातून अटलांटिक महासागरात जाणाऱ्या जहाजांना उलट क्रमाने हळूहळू वर चढवावे लागते आणि मग अटलांटिक महासागरात अलगद सोडावे लागते. सुवेझ कालवा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला जोडतो. पण या दोन समुद्रांच्या पातळीत फारसा फरक नाही. त्यामुळे हा कालवा पार करतांना असा खटाटोप करावा लागत नाही.
मालकी कुणाची?
पनामा कालवा अमेरिकेने बांधून पूर्ण केला. हा कालवा आपल्या देशातून जातो म्हणून या कालव्यावर पनामा देशाने आपला अधिकार सांगितला तेव्हा अमेरिकेने ही मागणी साफ धुडकावून लावली आणि लष्करी सामर्थ्याच्या भरवशावर हा कालवा आपल्या ताब्यात ठेवला. हा सरळसरळ दंडेलीचाच प्रकार म्हटला पाहिजे. पण इजिप्तच्या नासरच्या तुलनेत पनामामधील राजवटी अमेरिकेच्या तुलनेत पासंगालाही पुरणाऱ्या नव्हत्या त्यामुळे नासरप्रमाणे पानामाकडे या कालव्याचा ताबा शक्तीच्या भरवशावर येऊ शकला नाही. शेवटी लाजेखाजेस्तव अमेरिकेने पनामा देशच ताब्यात घेऊन तिथे आपले प्यादे सत्तेवर बसवले आणि आता एक कंपनी स्थापन करून तिच्या हाती कालव्याचे व्यवस्थापन सोपवले. या कालव्यातून आजवर दहा लाख जहाजे एका महासागरातून दुसऱ्या महासागरात गेली आहेत.
गंगावतरणाचे वेगळे स्वरूप
जगातील दोन महासागारांना जोडणारे हे कालवे म्हणजे मानवाच्या कौशल्याचे, जिद्दीचे परिश्रमाचे प्रतीक स्वरूप आहेत यात शंका नाही. निसर्गाने या महासागरांना भूमीची पाचार ठोकून वेगळे ठेवले होते. मानवाने ही पाचार खणून काढली आणि महासागर जोडले. हा या विश्वातला एक विक्रमच आहे. पण तो रक्तलांच्छित आहे. भगवान शंकराने असे काही होऊ दिले नाही. भगिरथाच्या महाप्रयासाने आणि तपस्येने गंगावतरण झाले तेव्हा शंकराने तिला आपल्या मस्तकी धारण करून प्रलय होऊ दिला नाही. गंगा त्याच्या जटातून वाहत भूमीवर अलगद उतरली. मानवाला किंचितही त्रास होऊ न देता गंगा जीवनदायिनी ठरली. भारतीय आणि पाश्चात्य विचारसरणीतील फरक तर या उदाहरणांवरून अधोरेखित होत नाहीना?